नवी दिल्ली : गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने यंदाच्या आयपीएल मोसमाची मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधून सुरुवात होणार आहे. 7 एप्रिलला हा सामना खेळवण्यात येईल. यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.


गतविजेत्या संघाच्या होमग्राऊंडवरच नव्या मोसमाचा पहिला सामना खेळवण्यात येतो. त्यानुसार हा मान मुंबईला मिळाला आहे. तर अंतिम सामन्याचा मानही मुंबईलाच देण्यात आला आहे, जो 27 मे रोजी वानखेडेवर खेळवण्यात येईल.  9 मैदानांवर 51 दिवसात 60 सामने खेळवण्यात येणार आहेत.


एकाच दिवशी दोन सामन्यांची सुरुवात 8 एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्याने होईल. तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ईडन गार्डनवर होईल.

दरम्यान, बीसीसीआयने ब्रॉडकास्टिंग स्पॉन्सर स्टार स्पोर्ट्सची सामन्यांची वेळ बदलण्याची मागणी मान्य केल्याचं दिसत नाही. कारण नियमित वेळेप्रमाणेच सामने सुरु होणार आहेत. दुपारचा सामना 4 वाजता, तर रात्रीचा सामना 8 वाजताच सुरु होईल. दुपारचा सामना 4 ऐवजी 5.30 वाजता, तर रात्रीचा सामना 7 वाजता सुरु करावा, अशी मागणी स्टार स्पोर्ट्सने केली होती.

यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचं दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडिअम हे राजस्थान रॉयल्सचं होमग्राऊंड असेल. राजस्थानची पहिली लढत 9 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी होईल.

संबंधित बातम्या :

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी

... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही

आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा

जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली