नवी दिल्ली : सध्या भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जवान शहीद झाले आहेत. पण दुसरीकडे यावरुन देशात राजकारणही सुरु झालं आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शहिदांच्या बलिदानाला थेट धर्माशी जोडलं आहे. त्यावर नॉर्थ कमांडचे कमांडर देवराज यांनी चोख उत्तर दिलं आहे.

"शहिदांना धर्माच्या चष्म्यातून पाहू नका," असं उत्तर लष्कराच्या नॉर्थ कमांडचे कमांडर देवराज यांनी दिलं आहे. तसेच ज्या व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, त्यांना लष्कराबद्दल माहिती नसल्याचा टोला त्यांनी ओवेसींचं नाव न घेता लगावला.

शिवाय, “जे हातात शस्त्र घेतायत ते केवळ दहशतवादीच आहेत, आणि त्यांचा मुकाबला करण्यास लष्कराचे जवान समर्थ आहेत,” असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांच्या थैमानात शहीद झालेल्यांमध्ये पाचजण मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा.’ असं उपरोधिक आवाहन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं.

शिवाय, ‘काश्मीरमध्ये सत्ताधारी भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष नौटंकी करत असून, फक्त मलई खाण्याचे उद्योग सुरु आहेत.’ असा आरोपही ओवेसी यांनी केला होता.

संबंधित बातम्या

मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेऊ नका : ओवेसी

गेल्या 44 दिवसात तब्बल 26 जवान शहीद