इंदूर : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं किंग्स इलेव्हन पंजाबचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवत आयपीएलच्या रणांगणात खळबळ निर्माण केली आहे. पंजाबनं दिलेलं 89 धावांचं माफक आव्हान सलामीच्या विराट कोहली आणि पार्थिव पटेलनं तब्बल 11 षटकं आणि 5 चेंडू राखून पार केलं.


विराटनं 28 चेंडूत नाबाद 48 तर पार्थिवनं  22 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी केली. त्याआधी बंगलोरच्या गोलंदाजांनी पंजाबचा अख्खा डाव ८८ धावांत गुंडाळला. पंजाबच्या फलंदाजांनी आज आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला नाही. त्यांनी बंगलोरच्या आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं.

बंगलोरकडून उमेश यादवनं २३ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, कॉलिन डी ग्रँडहोम आणि मोईन अलीनं प्रत्येकी एकेक विकेट काढली. पंजाबचे तीन फलंदाज धावचीत झाले.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सनं वानखेडे स्टेडियमवरच्या मुंबई इंडियन्सला हरवलं आणि आयपीएलच्या प्ले ऑफचं दुसरं तिकीट कन्फर्म झालं ते चेन्नई सुपर किंग्सचं. सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या प्ले ऑफचं पहिलं तिकीट आधीच कन्फर्म केलं होतं. त्यामुळं आता प्ले ऑफची दोनच तिकीटं शिल्लक आहेत. आणि त्यासाठी पंजाब, कोलकाता, राजस्थान, बंगलोर आणि मुंबई या पाच फौजांमध्ये तीव्र चुरस आहे.