ठाणे : एका अल्पवयीन मुलीच्या डोळ्यात विकृतानं मिरची पूड टाकल्याची घटना ठाणे शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत बारकाईनं तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपी मुलीला ओळखतही नसल्याचं चौकशीत समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

ठाण्यातील चरई परिसरात २५ एप्रिल रोजी डान्स क्लासहून घरी परतत असलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यात एका विकृतानं मिरची पूड फेकली होती. मिरची पूड डोळ्यात गेल्यानं तिला असह्य वेदना झाल्या होत्या. त्यानंतर तो विकृत तरुण तिथून शांतपणे चालत-चालत ठाण्याच्या तलावपाळीला गेला. तिथे त्यानं बोटिंगही केली. मात्र, यावेळी कुणीही या आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. या घटनेनंतर मुलीला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. त्याच्याआधारे पोलिसांनी या विकृताची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासची चक्र फिरवत आरोपीच्य मुसक्या आवळल्या. आरोपीचं नाव अब्दुल समद नूरमहंमद शाखानी असून त्याला मुंब्रा भागातून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, कोणतंही कारण नसताना आरोपीनं हा प्रकार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर अब्दुलने यापूर्वीही असे काही प्रकार केलेत का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. मात्र, हे सगळं प्रकरण उघड झाल्यावर ठाण्यासारख्या शहरातही मुली सुरक्षित नाहीत, हे अधोरेखित झालं आहे. त्यामुळं मुलींनी आता अधिक सजग राहण्याची गरज आहे.