मुंबई : आयपीएल 2018 स्पर्धेने जवळपास अर्ध टप्पा ओलांडला आहे. कोण-कोणते संघ प्लेऑफमध्ये जाणार हे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. पण या स्पर्धेतील तीन संघांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे.


रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या तीन संघांच्या एकूण चार परदेशी खेळाडूंना आयपीएलचा प्रवास मध्येच सोडून जावा लागणार आहे. हे सर्व खेळाडू इंग्लंडचे आहेत. यात मोईन अली (आरसीबी), क्रिस वोक्स (आरसीबी), मार्क वुड (सीएसके) आणि बेन स्टोक्स (आरआर) यांचा समावेश आहे.

इंग्लंडच्या संघाला पाकिस्तानसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. 24 मेपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिका सुरु होण्याच्या जवळपास एक आठवडाआधी (17 मेच्या सुमारास) हे खेळाडू मायदेशी परततील. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येईल.

आयपीएलमध्ये मार्क वुडने सीएसकेसाठी चांगली कामगिरी बजावली आहे. तर क्रिस वोक्सनेही काही काळासाठी सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप डोक्यावर घातली होती. तर आयपीएल 2018 चा महागडा खेळाडू बेन स्टोक्स फेल झाला आहे. राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मोईन अलीने केवळ एकच सामन्यात आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे.