मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातला सहभाग हा अनिश्चित मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमधून विराट अजूनही सावरलेला नाही.
रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराटला उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्याला धर्मशालाच्या चौथ्या कसोटीत खेळताही आलं नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी विराटला आणखी काही आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो सहभागी होऊ शकेल का, या बाबत शंका निर्माण झाली आहे.
आयपीएलचा सलामीचा सामना पाच एप्रिलला खेळवण्यात येणार असून, त्यात गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयस चॅलेंजर्स बंगलोरशी होणार आहे.
पण शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी आपल्याला आणखी काही आठवडे विश्रांतीची गरज असल्याचं विराट कोहलीने धर्मशालातल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावलं. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.