नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यं आणि कृतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता तर त्यांनी ट्विटरवर असं काही मत वक्तव्य केलंय, ज्यामुळे त्यांची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी चक्क राहुल गांधींचे मंत्रिमंडळच स्थापन केलं आहे.



वास्तविक, दिग्विजय सिंहांनी काँग्रेसच्या माजी खासदार राजकुमारी रतना सिंह यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. या प्रतिक्रियेत त्यांनी, ''रतना सिंह या काँग्रेसचे दिवंगत नेते दिनेश सिंह यांची कन्या आहेत. दिनेश सिंह हे पूर्वी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर ते राहुल गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते,'' असं लिहलं. त्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जाऊ लागली.

थोड्यावेळाने दिग्विजय सिंह यांना आपली चूक लक्षात आल्यावर, त्यांनी ते ट्वीट तत्काळ हटवले. पण तोपर्यंत सोशल मीडियामधून राहुल गांधींचं कोणतं मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे, असा प्रश्न दिग्विजय सिंह यांना विचारला जाऊ लागला होता.


विशेष म्हणजे, दिग्विजय सिंह यांनी जेव्हा आपली चूक सुधारुन दुसरा ट्वीट केला, त्यामध्येही लहानशी चूक केली. कारण दिग्विजय सिंह आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये राजीव गांधींच्या नावचे इंग्रजीतील स्पेलिंग Rajeev असे लिहलं आहे. वास्तविक, राजीव गांधी हे आपल्या नावाचं स्पेलिंग Rajiv असं लिहित असंत. मात्र, तिथेही दिग्विजय सिंह यांनी स्पेलिंगमध्ये चूक केल्याने त्यांच्यावर टीका होत होती.