IPL : पुण्याच्या विजयाचं श्रेय कुणाला? मनोज तिवारी म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2017 07:38 AM (IST)
मुंबई: आयपीएलमधल्या 'क्वालिफायर वन'च्या सामन्यात पुण्याच्या मुंबईवरच्या विजयाचं श्रेय महेंद्रसिंग धोनीला द्यायला हवं, अशी भूमिका मनोज तिवारीनं मांडली आहे. धोनी आणि तिवारीनं पुण्याच्या डावात चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूंत 73 धावांची भागीदारी रचली. त्यापैकी 41 धावांची लूट तर त्या दोघांनी अखेरच्या दोन षटकांत केली. बुमराच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळणं सोपं नसतं, याकडे तिवारीनं लक्ष वेधलं. धोनीनं त्याच बुमराच्या गोलंदाजीवर सहजतेनं मोठे फटके खेळून आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली, असं मतही तिवारीनं मांडलं. पुण्यानं मुंबईला विजयासाठी दिलेलं लक्ष्य गाठणं कठीण नव्हतं, पण वॉशिंग्टन सुंदरनं पॉवरप्लेमध्ये केलेल्या प्रभावी माऱ्यानं पुण्याच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, असंही तिवारीनं म्हटलं आहे.