पुणे : आयपीएलच्या दहाव्या मोसमातला सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्सने शतकी खेळी करत रायझिंग पुणे सुपरजायंटला 5 विकेट राखून विजय मिळवून दिला. गुजरात लायन्सने पुण्याला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं.

बेन स्टोक्सने शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देऊन पुण्याला विजय मिळवून दिला. त्याने केवळ 63 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याला पुण्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने महत्वपूर्ण साथ दिली. दोघांच्या भागीदारीने पुण्याला विजयाच्या जवळ आणलं.

मात्र 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत धोनी बाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने डॅनियल ख्रिश्चनच्या मदतीने विजय खेचून आणला.

पुण्याची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मनोज तिवारी पहिल्या 10 धावांमध्येच माघारी परतले. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्स आणि महेंद्र सिंह धोनीने धडाकेबाज खेळी करत पुण्याला विजय मिळवून दिला.

या विजयासोबत पुण्याने आयपीएलच्या गुणतिलाकेत चौथं स्थान कायम राखलं आहे. 12 गुणांसह पुणे सध्या चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद तिसऱ्या, कोलकाता दुसऱ्या आणि मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.