बंगळुरु : एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलमधला आठवा विजय साजरा केला. सलामीवीर फलंदाज ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर कोलकात्याने 6 विकेट्स राखून मात केली.
सलामीला आलेल्या सुनील नारायणने केवळ 17 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या साहाय्याने 54 धावा ठोकल्या. तर ख्रिस लीनने 22 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
सुनील नारायणने आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने केवळ 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणने केला होता. युसूफनेही 15 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं होतं.
बंगळुरुने कोलकात्याला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यातही बंगळुरुचे दिग्गज फलंदाज निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले. परिणामी बंगळुरुला घरच्या मैदानात आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी त्यांचा हा दहावा पराभव ठरला.
कोलकात्याने या विजयासोबतच गुणतालिकेत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्स 18 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर रायझिंग पुणे सुपरजायंट्स 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.