औरंगाबाद : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून औरंगाबादमधून सुरुवात झाली आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला सरकारला लक्ष केलं. शेतकऱ्यांचा अंत कुणीही पाहू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘मी कर्ज मुक्त होणार’ आंदोलन राबवणार असल्याचं सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,'' शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. त्यासाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 'मी कर्जमुक्त होणार' ही संकल्पना राबवणार आहे.

तसेच ''शेतकऱ्यांचा अंत म्हणजे, आपल्या सर्वांचा अंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत कुणीही पाहू नये,'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच तूर खरेदीसंदर्भात घातलेल्या अटी शिथिल करुन मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याची सर्व तूर राज्य सरकारने खरेदी करावी, असं ते यावेळी म्हणाले.

याशिवाय उद्धव ठाकरेंनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. ''सध्या राज्यात यात्रेचं पेव फुटले आहे. विरोधी पक्षात गेल्यावर काहीजणांना शेतकऱ्यांचं दु:ख दिसू लागलं आहे,'' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मध्यावधी निवडणुकीची तयारी?

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुखांच्या शिवसंपर्क यात्रेत मध्यावधी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुरु असल्याचं समजतं आहे. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत, की मध्यावधी निवडणुकांच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

शिवसंपर्क अभियानातून उद्धव ठाकरेंची विधानसभेची तयारी?

यूपीत योगी सरकार, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार : उद्धव ठाकरे