हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी 2 कोटी 60 लाख रुपयांना मोहम्मद सिराजला खरेदी केलं. वेगवान गोलंदाज म्हणून अफलातून कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आपलं नाव कमावलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सिराजची भारत 'ए' आणि शेष भारत संघातही समावेश झाला आहे.


सनरायझर्स हैदराबादने सिराजला तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांनी खरेदी केलं. आयपीएल लिलावानंतर सिराजच्या डोक्यात पहिली गोष्ट आली ती आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची. वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी हैदराबादच्या चांगल्या परिसरात घर घेण्याचं सिराजचं स्वप्न आहे आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे.

"क्रिकेटमधील पहिली कमाई मला आठवतेय. एका क्लबची मॅच होती आणि माझे मामा टीमचे कर्णधार होते. मी 25 ओव्हरच्या मॅचमध्ये 20 रन देऊन 9 विकेट घेतल्या होत्या. माझे मामा इतके आनंदी झाले होते की, त्यांनी मला बक्षीसाच्या स्वरुपात 500 रुपये दिले. तो एक मस्त अनुभव होता. मात्र, आता आयपीएलमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत बोली पोहोचली आणि मला सुखद धक्का बसला.", असे सिराजने म्हटलं.

सिराज पुढे म्हणाला, "वालिद साबने (वडील) खूप मेहनत केलीय. ते रिक्षा चालवायचे. मात्र, आमच्या बिकट आर्थिक स्थितीचा भार माझ्यावर किंवा माझ्या मोठ्या भावावर कधीच पडू दिला नाही. गोलंदाजीच्या एका स्पाईकची किंमतही खूप असते आणि तरीही ते माझ्यासाठी उत्कृष्ट दर्जाची स्पाईक आणायचे. चांगल्या भागात त्यांच्यासाठी एक घर खरेदी करायचं आहे."