हैदराबाद : विराट कोहलीच्या टीम इंडियानं हैदराबाद कसोटीत वेस्ट इंडिजचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा निर्विवाद विजय साजरा केला. या सामन्यात विंडीजनं टीम इंडियाला विजयासाठी 72 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं.
सलामीच्या पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलनं सतराव्या षटकात विजयी धाव घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पृथ्वीनं चार चौकारांसह नाबाद 33 धावांची, तर लोकेश राहुलनं एक चौकार आणि एका षटकारासह
नाबाद 33 धावांची खेळी उभारली. याआधी राजकोटच्या कसोटीत टीम इंडियानं विंडीजचा एक डाव आणि 272 धावांनी धुव्वा उडवला होता.
त्याआधी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव अवघ्या 127 धावांत आटोपला. भारताकडून उमेश यादवनं दुसऱ्या डावात विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानं तीन विकेट्स घेत त्याला सुरेख साथ दिली. याशिवाय रविचंद्रन अश्विननं दोन तर कुलदीप यादवनं एक विकेट घेतली. विंडीजकडून सुनील अँब्रोसनं सर्वाधिक 38 धावांचं योगदान दिलं.
पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतच्या दीडशतकी भागिदारीनंतरही टीम इंडियाचा पहिला डाव 367 धावांत आटोपला. टीम इंडियाला पहिल्या डावात अवघी 56 धावांचीच आघाडी मिळाली होती. अजिंक्य रहाणेनं सात चौकारांसह 80 धावांची खेळी उभारली. तर रिषभ पंतचं शतक सलग दुसऱ्या कसोटीतही हुकलं. त्यानं ११ चौकार आणि दोन षटकारांसह 92 धावांचं योगदान दिलं.
या दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी रचली. रहाणे आणि पंत माघारी परतल्यानंतर भारताच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर शॅनन गॅब्रियलनं तीन आणि वॅरिकननं दोन विकेट्स घेतल्या.
संबंधित बातम्या