माढा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असूनही राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे निवडून आले होते. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत विजयसिंह मोहिते-पाटलांचं एकहाती वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात यंदा आणखी दोघांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही आता माढा लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची एके काळी सोलापूर जिल्ह्यावर मजबूत पकड होती. मात्र विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी पंढरपुरातून निवडणूक लढवली आणि मोठा पराभव झाल्यावर मोहिते-पाटील यांची पकड ढिली पडत गेली. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आणि मोदी लाटेतही मोहित्यांनी या मतदारसंघात निसटता विजय मिळावत राष्ट्रवादीचा झेंडा रोवला.

आता आगामी लोकसभा निवडणुकीला वर्षवभराचा अवधी असताना राष्ट्रवादीने केलेल्या चाचपणीमध्ये माढ्यातील सुरक्षित जागेसाठी अनेक इच्छुक समोर येऊ लागले आहेत.

पक्षाने मुंबईत घेतलेल्या मुलाखतीमध्ये माजी महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. देशमुख हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असून सुरुवातीच्या काळात त्यांनी पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम केले होते. त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात पवारांनीच त्यांना आता समाजकारण आणि राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. देशमुख हे माण तालुक्यातील असून नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षे त्यांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा जवळून संबंध आला आहे. उमेदवारीची मागणी केल्यानंतर देशमुख यांनी नुकताच पंढरपूर, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला  भागात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

यातच शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सोलापूर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी देखील माढा लोकसभेसाठी दावा सांगत, आपण मोठ्या फरकाने विजयी होऊन दाखवू, असा विश्वास नेत्यांना दिला आहे. शरद पवार माढ्याचे खासदार असताना साळुंखे त्यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख होते.

सोलापूर विधानपरिषदेवर गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर साळुंखे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना तरुणांची मोठी फळी तयार केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयदादा यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असून आता त्यांनी विश्रांती घ्यावी अशीच अपेक्षा आता इच्छुक करू लागले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस मतदारसंघ असून सातारा जिल्ह्यातील मान खटाव आणि फलटण तालुक्याचा समावेश आहे. गेल्यावेळी भाजप आघाडीकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोहिते पाटील याना जेरीस आणले होते. यावेळी मात्र भाजप आघाडीकडे कोणताच सक्षम उमेदवार नसल्याने राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख याना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ हातातून गेल्यास मोहिते पाटलांकडे कोणतेच सत्तास्थान उरणार नसल्याने हा मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावायला सुरुवात केली असली तरी प्रभाकर देशमुख आणि दीपक साळुंखे यांच्या दाव्याने मोहिते पाटील यांची डोकेदुखी नक्की वाढली आहे.