नाशिक : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असून, कोर्टात अडकणारं आरक्षण नको, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली असून, सोयी-सुविधा देण्याबाबत आढावा घेतला जातोय. तसेच, आरक्षणाची मागणी आताच होत नसून, 1968 सालापासून आरक्षणाची चळवळ सुरु झालीय, असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी गिरीश महाजन, विनायक मेटे हेही उपस्थित होते.

“मराठा समाजाच्या संस्था असून देखील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत का नाही दिली? इतकी वर्षे सत्तेत असूनही आरक्षण का दिले नाही?” असे सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांवर निशाणा साधला.

“गेल्या 4 वर्षात 20 हजार नोकऱ्या निर्माण झाल्यात. त्यातील 16 टक्के मराठा समाजाला नोकऱ्या मिळणार आहेत. मात्र तेवढ्यात सर्व समाजाला काही मिळणार आहेत का?”, असे म्हणत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “व्यावसाय केला तर जास्त रोजगारनिर्मिती होते. व्यावसायासाठीचा कर्ज बँका देतील. विद्यार्थ्यांनी कर्ज थकवले, तर सरकार 75 टक्के कर्ज फेडेल. आता 600 विद्यार्थ्यांनी कर्ज घेतले आहे.”

शिवाय, “ज्या बँक कर्ज देणार नाहीत, त्या बँकेच्या बाहेर मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन करावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण हे मत मिळावे म्हणून नाही, ही आमची बांधिलकी आहे, असे सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.