पुणे : वेस्ट इंडिजनं पुण्यातील एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा 43 धावांनी धुव्वा उडवला. विडींजच्या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत मोठी चुरस निर्माण केली आहे. या विजयासह विंडीजनं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.


सामन्यात विंडीजनं टीम इंडियाला विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. पण विराट कोहलीच्या शतकानंतरही, विंडीज गोलंदाजांनी भारताचा अख्खा डाव 240 धावांत गुंडाळला. भारतीय कर्णधारानं एक खिंड लढवून 107 धावांची खेळी उभारली. भारताच्या अन्य दहा फलंदाजांना मिळून 127 धावाच करता आल्या आहेत.


विडींजनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा अवघ्या 8 धावा करून बाद झाला. शिखर धवन 35 धावा, रिषभ पंत 24 धावा, महेंद्र सिंह धोनी 7 धावा करून बाद झाला. शेवटी भुवनेश्वर कुमारने 10 आणि कुलदीप यादवनं 15 धावांचं योगदान दिलं.


विंडीजकडून मार्लन सॅम्युअल्सनं तीन विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डर, ओबेड मॅकॉय, अॅशले नर्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. विंडीज गोलंदाजांसमोर भारताचा डाव 47.4 षटकांत 240 धावांवर आटोपला.


त्याआधी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 50 षटकांत नऊ बाद 283 धावांची मजल मारली. जसप्रीत बुमरानं 35 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून, टीम इंडियाला विंडीजला स्वस्तात रोखता आलं नाही. विंडीजच्या डाव उभारणीत शाय होपनं मोलाची भूमिका बजावली. त्याचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. त्यानं 113 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 95 धावांची खेळी उभारली.


जसप्रीत बुमरानं विंडीजच्या चार विकेट्स काढून यशस्वी पुनरागमन केलं. कुलदीप यादवनं दोन, तर भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


विराटची शतकांची हॅटट्रीक


विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 38वं शतक झळकावलं. त्यानं 109 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह शतक ठोकलं. याआधी विराटनं गुवाहाटीत 140 धावांची आणि विशाखापट्टममध्ये नाबाद 157 धावांची खेळी केली होती.