अहमदनगर : प्रवरा नदीपात्रात तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात घडली. दोन कुटुंबातील तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. नदी पात्रात झालेल्या बेसुमार खड्यांमुळे तिघे बुडाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
10 वर्षीय समर्थ दीपक वाळे, 11 वर्षीय रोहित चंद्रकांत वैराळ, 9 वर्षीय वेदांत ऊर्फ बाळा विनोद वैराळ अशी मृत मुलांची नावे आहेत. सध्या प्रवरा नदीला पाणी असल्याने गावातील मुले पोहण्यासाठी नदीवर जात असतात. शाळा सुटल्यानंतर समर्थ, रोहित आणि वेदांतही नदीवर पोहण्यास गेले होते. मात्र नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
तिघांनी नदीत उतरल्यानंतर एकमेकांचे हात घट्ट पकडले होते. त्यामुळे खड्ड्यात तोल गेल्याने तिघेही पाण्यात बुडाले. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर जवळपास असलेल्या युवकांनी नदीपात्राकडे धाव घेतली आणि तिघांनाही बाहेर काढले.
तातडीने तिघांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.