कोलंबो (श्रीलंका): श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत, भारताने विराट कोहलीच्या नाबाद शतकानंतर, दुसरा डाव 3 बाद 240 धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील 309 धावांची आघाडी पकडता, आता लंकेसमोर विजयासाठी 550 धावांचं लक्ष्य आहे.

भारताने आज 3 बाद 189 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कोहलीने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला झटपट खेळी करत, शतक पूर्ण केलं. हे त्याचं कारकिर्दीतील 17 वं कसोटी शतक ठरलं. कोहलीने 133 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्यानंतर अवघ्या तीन धावा केल्यानंतर कोहलीने डाव घोषित करुन, श्रीलंकेला राऊंड फिगर 550 धावांचं आव्हान दिलं.

कोहलीने 136 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या. तर 18 चेंडूत 23 धावा करुन अजिंक्य रहाणेही नाबाद राहिला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ

सलामीचा अभिनव मुकुंद आणि कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 133 धावांच्या भागीदारीने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली.

पहिल्या डावातील शतकवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले. पण मुकुंद आणि विराटच्या जबाबदार फलंदाजीने भारताला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 189 धावांची मजल मारुन दिली. पहिल्या डावातली 309 धावांची आघाडी जमेस धरता टीम इंडियाची एकूण आघाडी 498 धावांची झाली.

अभिनव मुकुंदने आठ चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी विराट कोहली 76 धावांवर खेळत होता. विराटच्या या खेळीला पाच चौकारांचा साज आहे.

दरम्यान, त्याआधी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या 291 धावांत गुंडाळून पहिल्या डावात तब्बल 309 धावांची आघाडी घेतली. पण एवढ्या मोठ्या आघाडीनंतरही भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेवर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या दिलरुवान परेरानेही नाबाद 92 धावांची झुंजार खेळी केली. पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावात मोठ्या भागीदारी होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 291 धावांत आटोपला.

संबंधित बातम्या

INDvsSL : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी