माऊंट मॉन्गॅनुई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या र्धशतकांनंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि केदार जाधवच्या फटकेबाजीच्या बळावर 324 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने प्रत्येकी 2 गडी बाद केले.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 बाद 324 धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर धवन 66 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रोहित शर्मा 87 धावांवर बाद झाला. विराट कोहलीने 43 तर रायडूने 47 धावा केल्या. या दोघांचीही अर्धशतकं हुकली.  शेवटच्या काही षटकात धोनी (48) आणि केदार जाधव (22) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या तीनशेपार नेली. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने 2-2 बळी टिपले.

नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर एकहाती विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.  आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकल्यामुळे विजयी लय कायम राखण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. तर यजमान न्यूझीलंडचा सलामीच्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे आजच्या सामन्यात हा संघ तयारीनिशी विजयासाठी मैदानात उभा ठाकला आहे.

नेपियरच्या पहिल्या वन डेत निर्विवाद विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्यात शानदार सलामी दिली आहे. नेपियरच्या मैदानात किवी फलंदाजांनी भारताच्या फिरकी आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं होतं.  या सामन्यातही टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर आहे. त्यांच्या साथीला ऑफ स्पिनर केदार जाधव संघात आहे.