प्रजासत्ताक दिनी दहशतवाद्यांचे कट उधळले, चार दहशतवादी ठार
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2019 10:14 AM (IST)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही दहशतवादी काश्मीरमध्ये अतिरेकी कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज सकाळपासून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे दोन कट उधळून लावले आहेत.
श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही दहशतवादी काश्मीरमध्ये अतिरेकी कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज सकाळपासून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे दोन कट उधळून लावले आहेत. श्रीनगर आणि पुलवामा या दोन ठिकाणी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकींमध्ये भारतीय जवानांना चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आज सकाळी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. परंतु भारतीय जवानांनीदेखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. त्यानंतर काही दहशतवादी श्रीनगरमधील खोनमोह येथील एका शाळेत लपले असल्याची माहिती सुरक्षाबलाला मिळाली. माहिती मिळताच सुरक्षाबल, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे ऑपरेशन चालवले. खोनमोहमधील शाळेजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.