भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. परंतु वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी." त्यानंतर तासाभराने राऊत यांनी अजून एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'विनायका प्राण तळमळला'
विनायक सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. परंतु सावरकरांना नेहमी डावलले गेले. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली होती. परंतु भाजपच्या कार्यकाळातही सावरकरांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे.
काल संध्याकाळी भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे.
प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केले होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 25 जुलै 2017 रोजी ते राष्ट्रपती पदावरुन पायउतार झाले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या मंचावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.