कशी होईल महापौर पदाची निवडणूक
मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे तर 18 नोव्हेंबर ही महापौरपदाची उमेदवारी भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीनंतर भाजपनं 83 नगरसेवकांसह पहारेक-याची भूमीका स्विकारली. शिवसेनेकडे सर्व समित्यांची अध्यक्षपदे आणि महापौरपदही आले. मात्र,आता पुढील अडीच वर्षांसाठी निवडल्या जाणा-या महापौरपदाच्या निवडणूकीत भाजप ही पहारेक-याची भूमीका सोडेल का यावर सर्वांचं लक्ष आहे.
भाजपची भूमीका काय?
विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्रीपदावरुन भाज-सेनेत वितुष्ट आलं आणि सेनेनं पाठिंबा न दिल्यानं भाजपला मोठा पक्ष ठरुनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे, भाजपनं महापौरपदाच्या निवडणूकीत उतरायचा निर्णय घेतला तर सेनेसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यत आहे. भाजपची यंदाच्या महापौर पदाच्या निवडणूकीतील भूमीका काय असेल हे कोअर कमिटीच्या बैठकीत ठरेल असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी या नगरसेवकांमध्ये चुरस
यशवंत जाधव -
मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मागच्या वेळेला महापौर पद हुकले होते. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
मंगेश सातमकर-
माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांचीही मागील वेळेस महापौर बनण्याची संधी हुकली होती.
आशिष चेंबूरकर- माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आहेत. चेंबूरकर वरळीतील नगरसेवक आहेत. वरळीतून युवा नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
किशोरी पेडणेकर- महिला विभाग प्रमुख किशोरी पेडणेकर यांनाही अनेक वेळा समित्यांच्या अध्यक्ष पदाने चकवा दिला आहे. आदित्य ठाकरे आमदार झाल्याने त्यांचीही महापौर पदावर वर्णी लागू शकते.
शेखर वायंगणकर- मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभागात शेखर वायंगणकर हे सेना नेते अनिल परब व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या जवळचे नगरसेवक आहेत.
विशाखा राऊत- सभागृह नेत्या आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना महापौर बनवून त्यांच्या जागी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सभागृह नेता बनवले जाईल अशी चर्चाही महापालिकेत आहे.
महापालिकेतील पक्षांचे संख्याबळ
भाजपचे एकूण 83 नगरसेवक
शिवसेनेचे अपक्षांसह एकूण 94
काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8