इंदूर : मयांक अगरवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियानं पहिल्या डावात सहा बाद 493 धावांचा डोंगर उभारला आहे. मयांक अगरवालने झळकावलेल्या धडाकेबाज द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मयांकने सर्वात प्रथम अजिंक्य रहाणेच्या साथीने भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत मयांकने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत धावा काढल्या.


दरम्यान आज दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जाडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत आहेत. कालच्या एक बाद 86 धावसंख्येवरुन पुढे खेळताना टीम इंडियानं पुजारा आणि विराटला लवकर गमावलं. त्यानंतर मयांक अगरवालनं रहाणेच्या साथीनं टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं नेलं. रहाणे 86 धावांवर बाद झाला.

दुसरा दिवस पूर्णता मयांकच्या नावावर राहिला. मेहदी हसनच्या गोलंदाजीवर 196 धावांवर खेळत असताना मयांकने खणखणीत षटकार खेचत आपलं दुसरं द्विशतक साजरं केलं. आपल्या आठव्या कसोटी सामन्यात मयांकने ही कामगिरी करुन दाखवली. सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक तिसऱ्या स्थानावर आहे. द्विशतक झळकावल्यानंतर मयांकने पुन्हा एकदा फटकेबाजी सुरु केली. मात्र मेहदी हसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात अबु जायेदने सीमारेषेवर त्याचा झेल पकडला. मयांकने 330 चेंडूचा सामना करत 243 धावा केल्या, त्याच्या या खेळीत 28 चौकार आणि 8  षटकारांचा समावेश आहे. दरम्यान मयांकने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्तम धावसंख्येचीही नोंद केली आहे.

शेवटी जाडेजा आणि उमेश यादवने फटकेबाजी करत टीम इंडियाला आणखी मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. बांगलादेशकडून अबू जायेदने चार, इबादत हुसेन आणि मेहदी हसनने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

त्याआधी इंदूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर इंदूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला होता. बांगलादेशच्या डावात एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. त्यांची सुरुवातीलाच तीन बाद 31 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुशफिकुर रहीम आणि कर्णधार मोमिनुल हकनं 68 धावांची भागीदारी रचून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मोमिनुलने 8 चौकारांसह 80 चेंडूत 37 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 105 चेंडूत 43 धावा केल्या. लिटन दासने 21 धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. अखेर बांगलादेशचा डाव 150 धावांत आटोपला.  भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं होतं. तर रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि ईशांत शर्मानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या.