मुंबई : सर्वसाधारणपणे कोणीही कलाकार राजकारणात पडत नाही. अनेक कलाकार मंडळी नेतेमंडळींचं प्रमोशन करताना दिसतात. पण जिथे कमेंट करायची वेळ येते तिथे मात्र कुणीच काही बोलत नाही. असं असताना अचानक आज एक हॅशटॅग ट्रेण्ड होण्याकडे वाटचाल करत आहे. मराठीतल्या काही मोजक्या पण आघाडीच्या कलाकारांनी हा हॅशटॅग वापरल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आता सरकार नेमकं कुणाचं येणार याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित सरकार स्थापनेबाबत चर्चा करु लागले आहेत. तर दुसरीकडे भाजप मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या बातम्या येत आहेत. खरंतर या राजकीय चर्चेत नेमकं काय होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. अशावेळी कलाकार कधीच ठाम भूमिका घेत नाहीत. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. कोणतीही भूमिका घेतली की लगेच ट्रोलकरी त्यांना ट्रोल करु लागतात. एरव्ही नेहमी शांत असणारे कलाकार आज मात्र अचानक ट्विटरवर कार्यरत झाले. अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर आदी कलाकारांनी अचानकपणे #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरला. यात पुढे प्रश्नचिन्हही टाकण्यात आलं आहे.

अनेकांना या ट्वीटचा अर्थ कळेना. मराठीतल्या या नामवंत कलाकारांना पुन्हा निवडणूक हवीय की काय असं सामान्य लोकांना वाटून गेलं. तर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तातडीने याचा निषेध केला. भाजपने फूस लावल्यानेच कलाकारांनी हे ट्वीट केलं आहे की काय अशी शंका त्यांनी घेतली. पण अनेकांना माहित नसेल याचं खरं कारण वेगळंच आहे.


#पुन्हानिवडणूक हे एक प्रमोशनच आहे. आता ते कोणत्या सिनेमाचं असा प्रश्न तुम्हाला पडेल. दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित 'धुरळा' हा चित्रपट 2020 मध्ये जानेवारी महिन्यात येतो आहे. त्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून हा हॅशटॅग ट्रेण्ड करायला सुरुवात केली आहे. बाकी कोणीही काहीही बोलायला तयार नाही. अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी आदी कलाकार कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत कारण माध्यमं त्यांना फोन करणार हे उघड आहे. पण याच चित्रपटाच्या एका सदस्याने ही गोष्ट एबीपी माझाला सांगितली.