कोलकाता : टीम इंडियानं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचूनही, भारताचा अख्खा डाव 50 षटकांत 252 धावांत आटोपला.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं एकतिसावं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 107 चेंडूंत आठ चौकारांसह 92 धावांची खेळी उभारली. अजिंक्य रहाणेनं सलामीला 64 चेंडूंत सात चौकारांसह 55 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कूल्टर नाईल आणि केन रिचर्डसननं भारताच्या प्रत्यकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियानं चेन्नईची पहिली वन डे जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या पावसानं पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाला खरं तर ट्वेन्टी ट्वेन्टीला साजेसं आणि पाठलागासाठीही सोपं लक्ष्य दिलं होतं. पण सरशी टीम इंडियाचीच झाली.
चेन्नईच्या त्या वन डेत कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या मनगटी फिरकी गोलंदाजांनी चेन्नईच्या वन डेत गाजवलेलं वर्चस्व लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उर्वरित सामन्यांमध्येही त्यांचा धसका घेतलेला दिसला, तर आश्चर्य वाटायला नको.