सिंधुदुर्ग : "मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही काँग्रेस ते पाळलं नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो," अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.


कुडाळमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद व्यक्त केली.

दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला, असं सांगत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला.

काँग्रेसने आश्वासन पाळलं नाही
"काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही," असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढलं. "आम्ही राणेंना घाबरतो, असं काँग्रेस समोरुन दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही," अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी
"तीन वेळा म्हणाले मुख्यमंत्री करतो, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही. 48 आमदारांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा सांगूनही माझं नाव घोषित केलं नाही. प्रणव मुखर्जी, दिग्विजय सिंह विमानातून दिल्लीला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर केलं," असं राणे यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाणांनी खातंच बदललं
"पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मला भेटले. तुम्हाला हवं ते मंत्रीपद मागा, असं सांगत, त्यांनी माझं महसूल मंत्रीपद काढून उद्योगमंत्री बनवलं," अशी नाराजी नारायण राणेंनी व्यक्त केली.

मला आमदारकी मिळू नये म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत  
"मी आमदारकी मागितली नव्हती. राहुल गांधी यांनी मला आमदार केलं. मला आमदार करु नये यासाठी अशोक चव्हाण दिल्लीत बसून होते," असा आरोप नारायण राणेंनी यावेळी केला.

"विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला दिलं पाहिजे होतं. मी वरिष्ठ नेता असूनही मला गटनेता केलं नाही," असे नाराज राणे म्हणाले.

2 वा. सोनियांना पत्र, 2.25 वा आमदारकीचा राजीनामा
नारायण राणे म्हणाले की, "दोन वाजता सोनिया गांधींना राजीनामा पत्र पाठवलं आणि 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे राजीनामा पाठवला. पत्र पाठवून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे आभार मानले, त्यांच्यावर टीका केली नाही."

अनेक पक्षांकडून ऑफर्स, पण दसऱ्याच्या आधी निर्णय
"आज पक्ष सोडला आहे. पुढचा निर्णय नवरात्र संपण्याच्या आत घेऊ. माझ्याकडे अनेक पक्षाच्या ऑफर आहेत. योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेऊ. कोणाची काय ऑफर आहे ते मी योग्य वेळी तपासेन, राजकारणात येऊन मला 50 वर्ष झाली आहेत. आता महाराष्ट्र दौरा करणार आहे. नागपूर, औरंगाबाद, नांदेडला जाणार आहे," असं नारायण राणेंनी सांगितलं.

नितेश राणेंचा योग्य वेळी निर्णय
"निलेश राणेंनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ. पण नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेमधीलही अनेक आमदार राजीनामा देतील," असं नारायण राणे म्हणाले.

अशोक चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदाची पात्रता नाही
नारायण राणेंनी यावेळी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. तुमच्याकडे अध्यक्षपद आहे, पण माझ्याकडे नाही. तरीही माझ्या मागे किती लोक आहेत हे मी दाखवून देईन. माझे सगळ्या पक्षात मित्र आहेत, अशोक चव्हाणही मित्र आहेत पण प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पात्र नाहीत, असं राणे म्हणाले.

नारायण राणेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- तुम्ही काय आम्हाला बरखास्त करता, आम्ही तुम्हाला सोडून देतो : नारायण राणे

- हवं ते मंत्रिपद मागा म्हणून मला पृथ्वीराज चव्हाणांनी महसूल काढून उद्योगमंत्री दिलं : राणे

- बारा वर्षातील माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही : नारायण राणे

- अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली : नारायण राणे

- विधानपरिषदेत गेलो, विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला द्यायला हवं होतं. मी सिनियर असून गटनेता केलं नाही : राणे

- आता राहुल गांधींनी आमदार केलं, मी मागितलं नव्हतं, शेवटच्या दिवसापर्यंत अशोक चव्हाण दिल्लीत होते, राणेंना आमदार करु नका म्हणून : राणे

- 48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं:राणे

- महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो : नारायण

- 3 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली : राणे

- मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही : राणे

- तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं : नारायण राणे

- मला मॅडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार : राणे

- विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही : राणे

- 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो : नारायण राणे

- काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे : राणे

- आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते : राणे

-अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु : नारायण राणे