चेन्नई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं चेन्नईच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 282 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 21 षटकांत 164 धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. पण ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली.

भारतानं ऑस्ट्रेलियाला 21 षटकांत नऊ बाद 137 धावांत रोखलं. भारताकडून यजुवेंद्र चहलनं तीन, कुलदीप यादवनं दोन, हार्दिक पंड्यानं दोन आणि जसप्रीत बुमरानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, महेंद्रसिंग धोनीनं हार्दिक पंड्या आणि मग भुवनेश्वर कुमारच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी भारताला 50 षटकांत सात बाद 281 धावांची मजल मारून दिली होती.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ खरं तर 87 धावांतच माघारी धाडला होता. पण पंड्या आणि धोनीनं रचलेल्या 118 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला स्थैर्य दिलं. पंड्यानं 66 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावांची खेळी उभारली. धोनीनं 88 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली. धोनीनं भुवनेश्वर कुमारच्या साथीनं 72 धावांची भागीदारी रचली.