चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या चेन्नईच्या पहिल्या वन डेत पावसानं खेळखंडोबा केला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियानं  ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं आहे. पण पावसामुळं ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होऊ शकलेली नाही.


दरम्यान, महेंद्रसिंग धोनीनं आधी हार्दिक पंड्या आणि मग भुवनेश्वर कुमारच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी भारताला 50 षटकांत सात बाद 281 धावांची मजल मारुन दिली. त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ 87 धावांतच माघारी धाडला होता. पण पंड्या आणि धोनीनं रचलेल्या 118 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला स्थैर्य दिलं.

पंड्यानं 66 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावांची खेळी उभारली. धोनीनं 88 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली. धोनीनं भुवनेश्वर कुमारच्या साथीनं 72 धावांची भागीदारी रचली.