राजकोट : विराट कोहलीच्या टीम इंडियाने राजकोट वन डेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 341 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियन संघ 49.1 षटकांत 304 धावाच करु शकला. स्टीव्ह स्मिथने 98 धावांची खेळी करुन विजयासाठी प्रतिकार केला. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. भारताकडून मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले.


त्याआधी शिखर धवन, लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं राजकोटच्या दुसऱ्या वन डेत सहा बाद 340 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाचा सलामीवीर धवनचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी धवननं 90 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 96 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनं 52 चेंडूत 80 तर कर्णधार विराट कोहलीनं 78 धावांचं योगदान दिलं.


कुलदीप यादवच्या वन डे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण


टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं वन डे क्रिकेटमध्ये आपल्या विकेट्सचं शतक पूर्ण केलं. कुलदीपनं राजकोट वन डेत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला माघारी धाडत शंभर विकेट्सचा विक्रमी टप्पा गाठला. या कामगिरीसह कुलदीप वन डेत सर्वात जलद शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय तर जगातला तिसरा फिरकीपटू ठरला. कुलदीपनं 58 वन डेत ही कामगिरी पार पाडली. याआधी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खाननं अवघ्या 44 वन डेत विकेट्सचं शतक साजरं केलं होतं.