पिंपरी चिंचवड : तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अपक्ष नगरसेवक कुणाचे यावरुन आता रस्सीखेच सुरु झाली आहे. बिनविरोध निवडून आलेले निखिल भगत आमचेच पुरस्कृत उमेदवार आहेत, यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. बिनविरोध नगरसेवक झालेले निखिल भगत यांनी मात्र मी सर्व पक्षांचा उमेदवार असल्याचं सांगत गुगली टाकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे चुलत भाऊ संदीप शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्याजागी ही पोटनिवडणूक लागली होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. मुदतीपूर्वी केवळ निखिल भगत यांनीच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे भगत यांची बिनविरोध निवड झाल्याचं स्पष्ट झालं. यानिमित्ताने प्रशासन आणि सर्व पक्षीयांचा प्रचार आणि मतदान प्रक्रियेचा ताप टळला. जनसेवा विकास समितीने त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं होतं. मात्र नवनिर्वाचित अपक्ष उमेदवार निखिल भगत हे महाविकास आघाडी की भाजप पुरस्कृत यावरुन आता रस्सीखेच सुरु झाली आहे.
तळेगाव नगरपरिषदेची 2016 साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि जनसेवा विकास समितीच्या युतीने सत्ता काबीज केली. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नगरसेवक सुनील शेळकेंनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आणि ते आमदार झाले. त्यांच्या जागी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत जनसेवा विकास समिती आणि भाजपची युती तुटली. जनसेवा विकास समिती आणि महाविकास आघाडीने आमदार सुनील शेळकेंच्या काकी संगीता शेळकेंना निवडून दिलं. याच पोटनिवडणुकी दरम्यान आमदार शेळकेंचे चुलत भाऊ संदीप शेळकेंनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. मात्र काही महिने उरल्याने आणि हा मतदारसंघ संवेदनशील असल्याने सर्व पक्षीयांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचं ठरवलं.
निवडणुकीनंतर मात्र आता पुरस्कृतवरुन महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी नगरसेवक गणेश खांडगे यांनी निखिल भगत महाविकासआघाडीचे आणि भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडेंनी भाजपचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे दावे-प्रतिदावे सुरु केले आहेत. तर जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी भगत हे मूळचे भाजपचे असून, त्यांना सर्व पक्षीयांच्या संमतीने बिनविरोध निवडून आणल्याचं स्पष्ट केलं. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक भगत यांना सर्व पक्षीयांचा पाठिंबा असल्याचं सांगत सावध भूमिका घेतलेली आहे. निखिल भगत यांची भूमिका स्थायी आणि विविध समितींमध्ये निर्णायक ठरणार आहे.
भाजपकडे नगराध्यक्षसह 13 नगरसेवक आणि महाविकासआघाडी 13 नगरसेवक असल्याने नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक निखिल भगत कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. येत्या 30 जानेवारीच्यादरम्यान स्थायी आणि विविध समिती सभापतींच्या निवडणुका पार पडणार आहेत.