नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं. अॅरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा, पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि मार्कस स्टॉईनिसच्या झुंजार फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला 242 धावांचीच मजल मारता आली.


भारताकडून कर्णधार विराट कोहलीची शतकीय खेळी महत्वपू्र्ण ठरली. विराट कोहलीनं या सामन्यात त्याच्या कारकीर्दीतलं 40 वं शतक झळकावलं. जलद गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर विजय शंकरने शेवटच्या निर्णायक ओव्हरमध्ये दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. मात्र विजय शंकरने या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे शेवटचे दोन्ही गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. विराट फलंदाजीला उतरला, त्यावेळी भारताच्या डावातलं दुसरं षटक सुरू झालं होतं आणि भारतीय धावफलकावर एक बाद शून्य अशी बिकट स्थिती होती. त्यानंतर विराटनं लौकिकास साजेसा खेळ करत भारताला 250 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

विराटनं 120 चेंडूंत 116 धावांची खेळी केली, यात 10 चौकारांचा समावेश होता. त्यानं विजय शंकरच्या साथीनं रचलेल्या 81 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला आकार दिला. मग विराट आणि रवींद्र जाडेजानं सातव्या विकेटसाठी भारतीय डावात 67 धावांची भर घातली. याच दोन भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 250 धावांचा पल्ला गाठून दिला. विजय शंकरनं 46, तर रवींद्र जाडेजानं 21 धावांची खेळी उभारली.

विराट कोहलीनं नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेल्या शतकानं सर्वाधिक शतकांची शर्यत आणखी चुरशीची बनवली. विराट कोहलीचं एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे 40 वं शतक होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमापासून तो आता केवळ नऊ शतकं दूर आहे. तसेच तिसऱ्या क्रमाकांवरच्या रिकी पॉन्टिंगपेक्षा विराटच्या खजिन्यात आता 10 शतकं अधिक आहेत.