कल्याण : राज ठाकरे यांच्यासारख्या 'राष्ट्रवादी' नेत्याने पुलवामा हल्ल्यावरुन मोदींवर आरोप करणं, हा बालिशपणा असल्याची तिरकस टीका रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.


नरेंद्र मोदींनी राजकीय फायद्यासाठी 40 जवान मारले, अशी टीका काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राज ठाकरे हे 'राष्ट्रवादी' नेते आहेत, असं म्हणत आठवलेंनी त्यांना चिमटा काढला. तसेच हा राज ठाकरेंचा बालिशपणा असल्याचं सांगत एयर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांनी या मुद्द्यावर राजकारण न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.


सरकारने एयर स्ट्राईक केला की विरोधक पुरावे मागतात आणि नाही केला तर तिकडूनही बोलतात, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याचं आठवले म्हणाले. तर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी मसूद अजहर आणि दाऊदला आमच्या ताब्यात द्यावं, भारताशी मैत्री करावी, भारत तुम्हाला विकासात मदत करेल, असं आवाहन आठवले यांनी केलं.


दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबतच आपण राहणार असल्याचं स्पष्ट करताना आपल्याला लोकसभेच्या दोन जागा हव्या असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मी राज्यसभेवर आहे, त्यामुळे माझ्या पक्षाला लोकसभेच्या जागा देणार नसाल, तर ते चुकीचं असल्याचं आठवले म्हणाले.


वंचित बहुजन आघाडी जितकी मते घेईल, तितका आमचाच फायदा आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक दावाही आठवले यांनी केला. वंचित आघाडी काँग्रेससोबत गेली, तर त्यांच्याकडे सत्तेसाठी गेलेली लोक परत येतील, असा दावा करत प्रकाश आंबेडकर यांना रिपाइंत येण्याचं आवाहनही आठवले यांनी केलं.