अॅडलेड : विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा इतिहास घडवला. भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 31 धावांनी धुव्वा उडवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.अॅडलेड कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 323 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 धावांत गुंडाळून विजय साजरा केला.


दुसऱ्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, आणि मोहमद शमी या गोलंदाजांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली.  ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात शॉन मार्श व्यातिरिक्त कोणी मोठी खेळी करु शकलं नाही.

भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिली कसोटी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासोबतच भारताने ऑस्ट्रेलियात 10 वर्षानंतर तर अॅडलेडमध्ये 15 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. तर विराट कोहली दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे

चार दिवसात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर फिंचला 11 धावांवर अश्विनने बाद केले तर त्यांनतर आलेल्या ख्वाजाला अवघ्या 8 धावांवर अश्विननेच तंबूत धाडले. हॅरिसने 26 धावांची खेळी केली तर हॅन्डस्कॉम्ब 11 धावांवर बाद झाला. या दोघांनाही शमीने बाद केले.

त्याआधी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या पुजारानं दुसऱ्या डावातही नऊ चौकारांसह 71 धावांचं योगदान दिलं. तर रहाणेने सात चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली होती. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती.

टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.