मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंसमोर 256 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि फिंच या जोडीनं भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या दोघांनी 258 धावांची अभेद्य भागीदारी रचून वैयक्तिक शतकंही झळकावली.


अॅरॉन फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 110 धावा फटकावल्या. तर वॉर्नरनं 112 चेंडूत 17 चौकार आणि तीन षटकारांसह 128 धावांची खेळी साकारली. त्याआधी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा डाव 255 धावांत गुंडाळला. शिखर धवन आणि लोकेश राहुलनं केलेल्या शतकी भागिदारीचा टीम इंडियाला लाभ उठवता आला नाही.


त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं 74 धावांची तर लोकेश राहुलनं 47 धावांची खेळी केली. पण त्यानंतर टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं तीन तर केन रिचर्डसन आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


आजच्या समान्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा 10 धावांवार बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचे इतर खेळाडूंनी निराशाजनक खेळी केली.