मोहाली : अॅस्टन टर्नरच्या मॅचविनिंग खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं मोहाली वन डेत टीम इंडियाचा चार विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 359 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण सलामीचा उस्मान ख्वाजा आणि पीटर हॅन्ड्सकोम्बनं तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी रचून कांगारुंच्या विजयाचा पाया रचला.


हॅन्डस्कोम्बनं 105 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांसह 117 धावांची खेळी साकारली. तर उस्मान ख्वाजानं सात चौकारांसह 91 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अॅस्टन टर्नरनं अवघ्या 43 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी करत नाबाद 84 धावा कुटल्या.  या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीला आरोन फिंच आणि शॉन मार्श लवकरच तंबूत परतल्याने टीम इंडिया हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र यावर ख्वाजा,  पीटर हॅन्ड्सकोम्ब आणि अॅस्टन टर्नरनं यांनी पाणी फेरले.

तत्पूर्वी, शिखर धवन आणि रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं मोहाली वन डेत नऊ बाद 358 धावांचा डोंगर उभारला होता. धवन आणि रोहितनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. धवननं दमदार फलंदाजी करताना करताना 143 धावांची खेळी उभारली. तर रोहित शर्माचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. रोहितनं 92 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचली.

मोहाली वन डेत टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली.  धवन आणि रोहितनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन आक्रमणावर वर्चस्व गाजवलं. पहिल्या तिन्ही वन डेत अपयशी ठरलेल्या धवनला या सामन्यात सूर सापडला. त्यानं आपल्या कारकीर्दीतलं 28 वं अर्धशतक साजरं केलं.

विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सर्वबाद 281 धावांचीच मजल मारता आली होती.