मेलबर्न : विराट कोहलीच्या टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा इतिहास घडवण्यासाठी 231 धावांचं आव्हान आहे. भारतीय गोलंदाजांनी मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 48.4 षटकात अवघ्या 230 धावांत गुंडाळला आहे. त्यामुळे मेलबर्नच्या वन डेसह तीन सामन्यांची मालिका जिंकायची, तर भारतीय संघासमोर आता 231 धावांचं लक्ष्य आहे.

मेलबर्नच्या वन डेवर आज सकाळपासून पावसाचं सावट होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. यजुवेंद्र चहलने 42 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियामध्ये एकाच वनडे सामन्यात सहा विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेतही विजय मिळवून, तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. भारतीय संघाने अॅडलेडची दुसरी वन डे जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

विराट कोहलीच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी भारतानं तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. आता टीम इंडियानं वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर भारतीय क्रिकेटमधलं ते मोठं यश ठरेल.

विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर तो नवा इतिहास ठरेल. भारतीय संघाला आजवरच्या इतिहासात ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यांची द्विपक्षीय मालिका कधीही जिंकता आलेली नाही. किंबहुना 2016 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत तर 1-4 अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

मात्र या वेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियातली वन डे सामन्यांची मालिका जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. वन डे सामन्यांच्या आजवरच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात 1985 साली जागतिक विजेतेपद आणि 2008 साली सीबी सीरिजचं विजेतेपद पटकावता आलं आहे.