अहमदनगर : येथील डॉन बॉस्को शाळेची सहलीला गेलेली बस परतत असताना बसचा मोठा अपघात झाला आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर लक्झरी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांच्या इंजिन्सनी पेट घेतला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका शिक्षकाचा, बस क्लिनरचा आणि पिकअप चालकाचा समावेश आहे. तसेच 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत.


पुण्याच्या पिंपरी-पेंढार गावाजवळ गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. आनंद ट्रॅव्हल्सच्या बसमधून गेलेली डॉन बॉस्को शाळेची सहल कल्याणहून नगरकडे परतत होती. त्याचवेळी कांद्याची वाहतूक करणारा पिकअप हा आळेफाट्याहून कल्याणचा दिशेला निघाला होता. तेव्हाच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या इंजिन्सने जागीच पेट घेतला. आग वेळीच विझली खरी मात्र जोराची ठोकर बसल्याने पिकअप चालक, बस क्लिनर आणि शाळेच्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील 47 विद्यार्थ्यांपैकी 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

दुसरीकडे या अपघातामुळे पिकअपमधील शेकडो किलो कांदा रस्त्यावर पसरला. अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ओतूर पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अपघात नेमका कोणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.