औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता लवकरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले. मात्र यात नेमका कुणाचा समावेश असेल, मित्रपक्षांना या विस्तारात स्थान असेल का यावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं.दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या मंत्र्याचा समावेश होतो, की जुन्यांचाच खातेबदल होतो हे पाहावं लागेल.

गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. त्याआधारे मंत्रिमंडळातून कोणाला वगळायचे आणि कोणाला संधी द्यायची हे ठरवलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

राज्याच्या मंत्रिमंडळात राणेंची वर्णी?

दरम्यान नारायण राणेंची भाजपमध्ये एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसात उधाण आलं आहे. यातच नारायण राणेंचे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी शनिवारी बरखास्त केल्यानंतर, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा नारायण राणेंनी आज दिला आहे.

त्यामुळे दसऱ्यापूर्वी सिमोल्लंघन करणाऱ्या राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचाही विस्तारात समावेश?

दरम्यान नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे आपल्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार बदल्या-बढत्यांचा उत्सव असून त्यावर फार चर्चा न केलेली बरी असा खोचक टोला लगावला होता. आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळतं का? तसंच राज्यमंत्र्यांऐवजी कॅबिनेट मंत्रिपदी शिवसेनेच्या नेत्यांची वर्णी लागते हा हे पाहणंही महत्त्वाचं आहे.