इंदूर : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या इंदूर कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी धुव्वा उडवला. 343 धावांची भली मोठी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने कालच्याच सहा बाद 493 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.


यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. मुशफिकुर रहीमनं 64 धावा करुन एकाकी झुंज दिली. मेहदी हसनने 38, लिटन दासने 35 तर मोहम्मद मिथुनने 18 धावा केला. त्यामुळे बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. शमीपाठोपाठ रविचंद्रन अश्विननं तीन, उमेश यादवनं दोन तर ईशांत शर्मानं दोन विकेट्स घेतल्या.


मयांक अगरवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 343 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियानं सहा बाद 439 धावा ठोकल्या होत्या. मयांक अगरवालवनं 243 धावांची दमदार खेळी उभारली. त्याच्या या खेळीत 28 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. मयांकनं रहाणेसह 190 धावांची भागीदारी रचली होती. अजिंक्य रहाणेनं नऊ चौकारांसह 86 धावांचं योगदान दिलं.


भारत-बांगलादेशमधील पुढील कसोटी सामना 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा पहिला डे-नाईट कसोटी सामना असणार आहे.