जकार्ता : सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या भारताच्या एमसी मेरी कोमने इंडोनेशियामधील प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. मेरी कोमने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रॅन्कचा धुव्वा उडवला.


मेरीने ही लढत 5-0 अशी एकतर्फी जिंकली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर मेरीचं हे यश महत्वाचं मानलं जात आहे. रशियात होणाऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी बजावून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्याचा मेरी कोमचा प्रयत्न राहील.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर मेरीने ट्विटरद्वारे तिचा आनंद व्यक्त केला. मेरीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रेसिडेंट्स कपमध्ये मला मिळालेलं हे सुवर्णपदक हे देशासाठी आहे. या विजयामुळे एक गोष्ट कळली आहे की, मी अजून पुढे जाण्यासाठी सज्ज आहे.

मेरीने म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्पर्धा जिंकता, तेव्हातुम्ही अपार कष्ट घेतलेले असतात, इतर स्पर्धकांच्या तुलनेत तुम्ही जास्त प्रयत्न केलेले असतात. त्यामुळेच तुम्ही जिंकता. यावरुन मला पुढे जाण्याची अधिक प्रेरणा मिळते. मी माझे प्रशिक्षक, सहयोगी स्टाफ, क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानते.