पिंपरी : भोसरीत तीन मुलांसह आईचा मृतदेह घरात फासाला आढळल्याने खळबळ उडाली आहे. आईने तिन्ही मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फळ व्यवसायात नुकसान झाल्याने पती-पत्नीचा झालेला वाद या घटनेला कारणीभूत ठरला आहे. फातिमा बागवान असं 28 वर्षीय आईचं तर अल्फीया (9 वर्ष), जोया (7 वर्ष) आणि जियान (6 वर्ष) अशी मुलांची नावं आहेत.


मूळ कर्नाटक येथील हे कुटुंब पुण्यात फळ विकून पोट भरत असे. आधी वारजे, मग तळेगाव आणि चार दिवसांपासून भोसरीत ते स्थायिक झालं. वारजे आणि तळेगाव इथं मोठं नुकसान झेलून ते भोसरीत नव्यानं व्यवसाय टाकणार होते. पण तत्पूर्वी आज सकाळी पती-पत्नीचा वाद झाला. व्यवसाय करता येत नसल्याने आपलं कुटुंब स्थिर राहत नसल्याचा ठपका पत्नीने पतीवर ठेवला. यामुळं नाराज पती सकाळी साडे दहा वाजता घर सोडून गेला.

तो सायंकाळी चार वाजता परतला त्यावेळी घराचे दार वाजवले. पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता. मग घर मालक अस्लम पठाण यांनी भोसरी पोलिसांशी संपर्क साधला. घराचे दार तोडले असता तिन्ही मुलं आणि आई फासाला लटकलेली आढळली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. पतीने घडला प्रकार सांगताच भांडणाचे कारण समोर आले. फातिमा यांनी तिन्ही मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पण शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय घडलंय हे स्पष्ट होणार आहे.

या महिलेने तीन मुलांना मारून स्वतः आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांना संशयास्पद काही सापडलेले नाही.