Indonesia Open 2023 : भारताचे युवा बॅटमिंटनपट्टू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने इंडोनेशियामध्ये तिरंगा फडकावलाय. इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक आणि चिराग या जोडीने विजय मिळवलाय. या जोडीने मलेशियाच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभूत करत इंडोनेशियामध्ये इतिहास रचलाय. सात्विक आणि चिराग या जोडीने याआधी सुपर 100, सुपर 300, सुपर 500 आणि सुपर 750 या जेतेपदावर नाव कोरलेय. असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. आज सात्विक आणि चिराग या युवा जोडीने मलेशियाच्या जोडीचा 21-17, 21-18 असा पराभव करत भारताची मान उंचावली आहे.


इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन  स्पर्धा ही जगतातील मानाची स्पर्धा मानली जाते.  यामध्ये अनेक आघाडीचे खेळाडू भाग घेत असतात. यामध्ये भारताच्या जोडीने करिष्मा केलाय.  पुरुष दुहेरीमध्ये सात्विक व चिराग या जोडीने उपांत्य फेरीचा सामन्यात अव्वल मानांकित जोडीला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर फायनलमध्ये त्यांनी मलेशियाच्या चिया व सोह या वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव केला. मलेशियाच्या जोडीकडून सातवेला पराभवाचा सामना केल्यानंतर अखेर आता सात्विक आणि चिराग या जोडीला पहिला विजय मिळालाय.  आरोन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीची वर्ल्ड चॅम्पियन जोडी आहे. या जोडीचा पराभव करत चिराग आणि सात्विक यांनी देशाची मान उंचावली आहे.  


इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक आणि चिराग जोडीने पहिल्यापासूनच वर्चस्व मिळवले. मलेशियाच्या  चिया व सोह या जोडीचा त्यांनी सहज पराभव केला. चिया आणि सोह या जोडीला सामन्यात एकदाही वर्चस्व मिळवण्याची संधी दिली नाही. भारतीय जोडीने अखेरीस 21-17, 21-18 असे विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.  2018 पासून 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा सुरु झाली आहे, तेव्हापासून कोणत्याही भारतीय जोडीला आतापर्यंत विजेतेपद पटकावता आले नव्हते. चिराग आणि सात्विक यांनी जेतेपद मिळवत इतिहास रचलाय. या विजयानंतर सात्विक व चिराग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यापासून राजकीय नेत्यांनीही त्यांचे कौतुक केलेय. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे कौतुक केलेय. त्याशिवाय अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्यात.