Indonesia Open 2022 : जगातील महान बॅडमिंटन स्पर्धा थॉमस कपमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय बॅडमिंटनपटू इंडोनेशिया ओपन 2022 (Indonesia Open 2022) स्पर्धा खेळत आहेत. या स्पर्धेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस प्रणॉय याने हाँगकाँगच्या एंग का लोंग एंगस याला सरळ सेट्समध्ये मात देत थेट उपांत्यपूर्व फेरी अर्थात  क्वॉर्टर फायनलमध्ये धडक घेतली आहे.






 


मूळच्या केरळच्या असणाऱ्या 29 वर्षीय प्रणॉयने 41 मिनिटं चाललेल्या सामनयात 21-11 आणि 21-18 अशा दोन सरळ सेट्समध्ये विजय मिळवत जगातील 12 व्या नंबरचा खेळाडू एंग याला पराभूत केलं आहे. एंग विरुद्ध प्रणॉयने मिळवलेला हा चौथा विजय आहे. आता प्रणॉयचा सामना उपांत्य पूर्व फेरीत डेन्मार्कच्या रासमस गेमके किंवा फ्रान्सच्या ब्राइस लीवरडेज याच्याशी होईल. 


इतर खेळाडूची खराब कामगिरी


इतर भारतीय खेळाडूंचा विचार करता समीर वर्मा याला जगातील पाचव्या नंबरचा खेळाडू असणाऱ्या मलेशियाचा ली जी जिया याने मात देत स्पर्धेबाहेर केलं. या सामन्यात समीर 21-10 आणि 21-13 अशा दोन सरळ सेट्समध्ये पराभूत झाला. दुसरीकडे अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना चेन किंग चेन आणि जिया यी फान या जोडीने 16-21 आणि 13-21 च्या फरकाने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे. 


थॉमस कपमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय 


बॅटमिंटन खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारतानं इंडोनेशियाला मात देत विजय मिळवला. स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली. यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या