Indonesia Masters 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन  (Lakshya Sen) यांना शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. ज्यामुळं भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. सेनला चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेननं (Chou Tien-chen) पराभूत केलं. तर, सिंधूला थायलंडच्या रचानोक इंतानॉनकडून 12-21, 10-21 ने पराभव पत्करावा लागलाय.


पीव्ही सिंधुची निराशाजनक कामगिरी
इंतानोननं अतिशय आक्रमक खेळ केला आणि अर्ध्या तासात सामन्याचा निकाल लागला. पहिल्या ब्रेकपर्यंत इंतानोननं 11-5 अशी भक्कम आघाडी घेतली. या कालावधीत सिंधूला केवळ दोन गुण करता आले. बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी थायलंडचा शटलर इंतानोननं कॉर्नर आणि डिप शॉट्सचा चांगला उपयोग केला. महत्वाचं म्हणजे, 2013 च्या विश्वविजेत्या इंतानोनविरुद्ध सिंधूचा हा सलग पाचवा पराभव होता. तर, सिंधुनं इतानोनंसह आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. 



लक्ष्य सेनचा पराभव
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीत भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनला चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनकडून पराभव स्वीकारावा लागलाय. जागतिक चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनला चाऊ तिएन चेननं 21-16, 12-21, 21-14 अशा फरकानं पराभूत केलंय. थॉमस चषकानंतर लक्ष्य सेनची ही दुसरी स्पर्धा होती. त्यानं  थायलँड ओपनमधून ब्रेक घेतला होता. 


या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चाऊ तिएन चेनला पराभूत करून लक्ष्य सेननं जोरदार कमबॅक केलं. मात्र, अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला. निर्णायक सेटमध्ये सलग तीन गुण मिळवून ब्रेकपर्यंत सहा गुणांची आघाडी घेतली आणि नंतर ती कायम ठेवली. सेननं दोन मॅच पॉइंट वाचवले. पण त्याला चाऊला विजयापासून रोखता आलं नाही.


हे देखील वाचा-