नॉटिंगहॅम : इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या कुलदीप यादवचं कर्णधार विराट कोहलीने भरभरुन कौतुक केलं. इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदाच पाच पेक्षा जास्त (25 धावा देऊन सहा विकेट) विकेट घेण्याचा विक्रम कुलदीपच्या नावावर झाला. ज्यामुळे यजमान संघाची सुरुवात चांगली होऊनही 268 धावांवरच डाव आटोपला.

रोहित शर्माचा शतकी धमाका

इंग्लंडने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 114 चेंडूत चार षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 137 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार विराट कोहलीनेही 82 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या, ज्यामुळे भारताला सहज विजय मिळवता आला.

यापेक्षा चांगला स्पेल पाहिला नाही : विराट

कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर कुलदीप यादवचं कौतुक केलं. ''आम्ही चांगली कामगिरी केली. कुलदीप सर्वोत्कृष्ट होता. मला नाही वाटत की गेल्या काही दिवसात मी यापेक्षा चांगला वन डे स्पेल पाहिला असेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचं आम्ही ठरवलं होतं, कारण, त्यामुळेच जिंकता येऊ शकतं. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट मिळवता नाही आल्या तर अडचणी वाढतात,'' असं विराट म्हणाला.

कसोटी संघात आश्चर्यकारक नावं असतील : विराट

कसोटी संघात कुलदीपला जागा मिळण्याबाबतही विराटला विचारण्यात आलं. ''तिथे काही नावं आश्चर्यकारक असू शकतात. कसोटी संघाची निवड करण्यासाठी अजून वेळ आहे. इंग्लंडच्या फलंदाजांचा संघर्ष पाहता आम्ही असं करण्याचं धाडस करु शकतो. वातावरण चांगलं आहे. आतापर्यंत तरी चांगलं राहिलं आहे. आम्ही घरापासून दूर आहोत असं वाटतच नाही,'' असंही विराट म्हणाला.

इंग्लंडच्या कर्णधाराकडूनही भारतीय गोलंदाजीचं कौतुक

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना उत्कृष्ट पद्धतीने आपल्या जाळ्यात अडकवलं हे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही मान्य केलं. ''निश्चितच हा आमच्यासाठी चांगला दिवस नव्हता. याचं संपूर्ण श्रेय भारताला जातं. त्यांनी पूर्णपणे आम्हाला पछाडलं,'' अशी कबुली मॉर्गनने सामन्यानंतर बोलताना दिली.

इंग्लंडच्या फलंदाजांना कुलदीपच्या गोलंदाजीवर खेळताना मोठ्या अडचणी आल्या, जे मॉर्गननेही स्वीकारलं. ''स्पिनविरुद्ध खेळणं हे आव्हान असतं आणि आमची यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला त्यांना (कुलदीप आणि यजुवेंद्र चहल) बसून खेळण्याचा चांगला मार्ग शोधावा लागेल. लॉर्ड्समध्ये परिस्थिती कदाचित वेगळी असेल,'' असं म्हणत मॉर्गनने सूचक इशाराही दिला.

''त्याने (कुलदीपने) इतर स्पिनर्सच्या तुलनेत चांगला टर्न मिळवला. स्पिनविरुद्ध खेळण्याच्या क्षमतेत आम्हाला सुधारणा करावी लागेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर आगामी विश्वचषकापर्यंत आम्हाला आमची कामगिरी सुधारावी लागेल आणि हेच आमचं मोठं आव्हान आहे,'' असं मॉर्गनने सांगितलं.