सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील आंब्याचे झाड पर्यटकांचं सेल्फी पॉईंट बनलं आहे. या आंब्याच्या झाडापासून प्रवास करणारे इथे सेल्फी घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

कलंबिस्त गावातील या आंब्याच्या झाडाला वेगवेगळ्या वेलींनी विलखा घातला आहे. वेलींच्या रुपात आंब्याच्या झाडावर पसरलेली चादर इतकी सुंदर दिसते आहे की, जणू निसर्गाचा एक अद्भुत अविष्कार.

आंब्याच्या झाडाचं एक टोक रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला खाली चिकटल्याने रस्त्याला या वेलींनी एकप्रकारे कमान तयार केली आहे.



या गावाच्या जवळूनच वेंगुर्ला-बेळगाव राज्य महामार्ग जातो, त्यामुळे या ठिकाणाहून जाणारे अनेक पर्यटक आवर्जून थांबतात आणि सेल्फी घेतात.

वैशिष्ट्यपूर्ण असलेलं हे झाड म्हणजे कलंबिस्त गावाचे प्रवेशद्वार मानले जाते. कलंबिस्त गावात देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध आहे. गावच्या वेशीवर असलेल्या या झाडामुळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

निसर्गसंपन्न असलेल्या कोकणात पावसाळ्यातील रुप मनमोहक असतं. चहूबाजूंनी हिरव्यागार निसर्गाची मुक्त उधळण पहायला मिळते. डोंगरदऱ्यांमध्ये धुके, उंचावरुन खळखळणारे धबधबे यामुळे निसर्गाचे हे रुप पाहून त्याच्या प्रेमात पडावसं वाटतं.