भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रिलीज झाला होता. या सिनेमात मिल्खा सिंहांची भूमिका साकारणाऱ्या फरहान अख्तरनेही हिमा दासचं अभिनंदन केलं आहे.
‘वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हिमा दासचं अभिनंदन. योगायोग म्हणजे, 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आमचा सिनेमा ‘भाग मिल्खा भाग’ रिलीज झाला होता आणि आजच भारताने सुवर्णपदक जिंकण्याचं मिल्खाजींचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे,’ असं ट्वीट फरहान अख्तरने केलं आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल हिमाचं अभिनंदन केलं आहे.
‘ऐतिहासिक! भारतासाठी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन,’ असं ट्वीट करत अभिनेता अक्षय कुमारने हिमाचं कौतुक केलं आहे.
यासोबतच अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा, अभिनेते बोमन इरानी यांनीही ट्विटरवरुन हिमा दासचं अभिनंदन केलं आहे.
हिमा दासचा विश्वविक्रम
फिनलँडच्या टॅम्पेरेमध्ये सुरु असलेल्या आयएएफ वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत हिमा दासने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे भारतासाठी जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली महिला धावपटू ठरली आहे.
भारताच्या या 18 वर्षीय धावपटूने 51.46 सेकंदांची वेळ नोंदवत पहिलं स्थान मिळवलं.‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी सर्व देशवासियांचे आभारी मानते,’ असं हिमा दासने म्हटलं आहे.