मुंबई : जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीग आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. येत्या 2021 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये 8 संघ खेळतात. अहमदाबाद, पुणे आणि रांची किंवा जमशेदपूर यामधील दोन संघ 2021 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.


अहमदाबादसाठी अदानी ग्रुप, पुणेसाठी आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि रांची किंवा जमशेदपूरसाठी टाटा ग्रुप रेसमध्ये आहे. याआधी 2011 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळले होते. मात्र काही विवादांनंतर दोन संघ बाद करण्यात आले आणि ही संख्या पुन्हा आठवर आली होती.


दोन नवीन संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठीची योजन तयार झाली असून याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा सुरळीत पार पडली तर 2021 मध्ये आयपीएलमध्ये दहा संघ खेळताना दिसतील. याबाबत आयपीएल संघ मालक आणि अधिकारी यांच्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. जर नवीन दोन संघ दाखल झाले तर आयपीएलला याचा फायदाच होईल, यावर सगळ्यांचं एक मत झालं आहे.


अदानी ग्रुपने 2010 मध्ये अहमदाबादची फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. 2011 मध्ये सहारा ग्रुपने पुणे वॉरिअर्स संघ विकत घेतला होता. मात्र 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सला आयपीएलमधून हटवण्यात आलं आहे.


पुणे वॉरिअर्सने आयपीएलच्या 2011, 2012, 2013 या सीजमध्ये भाग घेतला होता. 2011 मध्ये कोच्ची टस्कर संघही आयपीएलमध्ये सामील करण्यात आला होता. कोच्ची टस्करला त्याच वर्षी आयपीएलमधून हटवण्यात आलं होतं.


VIDEO | माझा 20-20 | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा