मुंबई: मुंबई इंडियन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा तीन धावांनी निसटता पराभव करून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.


वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबईनं पंजाबला विजयासाठी १८७ धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं ९४ धावांची आणि अॅरॉन फिन्चनं ४६ धावांची खेळी उभारूनही, पंजाबला वीस षटकांत पाच बाद १८३ धावांची मजल मारता आली.

जसप्रीत बुमरानं १५ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडून मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्याआधी, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचून, मुंबईच्या डावाची उभारणी केली.

पोलार्डनं २३ चेंडूंत ५०, तर कृणाल पंड्यानं ३२ धावांची खेळी केली. मात्र कर्णधार रोहित शर्मा या डावातही अपयशी ठरला. तो 6 धावा करुन तंबूत परतला.

दुसरीकडे फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवने झंझावती सुरुवात केली, मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. 15 चेंडूत 27 धावा करुन तो माघारी परतला. त्याआधी सलामीवीर लुईस अवघ्या 9 धावांवर बाद झाला होता.

इशान किशन 20, हार्दिक पंड्या 9, कटिंगने 4 धावा केल्याने मुंबईला 20 षटकात 8 बाद 186 धावा करता आल्या होत्या.