बंगळुरु: ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं विराट कोहलीच्या बंगलोरचा 19 धावांनी पराभव करून आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतलं आपलं स्थान कायम राखलं.


बंगलोरचं आयपीएलमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे, पण पंजाबचा हा दहा सामन्यांमधला पाचवा विजय ठरला.

या विजयासह पंजाबच्या खात्यात 10 गुण झाले असून, गुणतालिकेत पंजाब पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात बंगलोरच्या गोलंदाजांनी पंजाबला वीस षटकांत सात बाद 138 धावांत रोखून आपल्या संघाला विजयाची संधी मिळवून दिली होती. पण बंगलोरच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आलं.

त्यांचा अख्खा डाव 19 षटकांत 119 धावांत आटोपला. बंगलोरच्या डावात ख्रिस गेलला भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहली सहा, एबी डिव्हिलियर्स 10, तर केदार जाधव सहा धावांवर बाद झाला.

पंजाबकडून संदीप शर्माने भेदक गोलंदाजी केली. संदीपने कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स या महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं.  एकाच सामन्यात या दिग्गज फलंदाजांना बाद करणारा संदीप शर्मा एकमेव गोलंदाज ठरला आहे.

संदीप शर्माने 4 षटकात 22 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. आयपीएलच्या दहाव्या मोसमात संदीप शर्माने 20.28 च्या सरासरीने 9 सामन्यात आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत.